संघर्षातून जीवन जगत असलेल्या स्त्रीची कहाणी




 दिनांक ११/२/२०२३ रोजी मी माझ्या आई-वडिलांसोबत गावाकडे गेले होते. रोजच्या धाकधूकीच्या  जीवनातून वेगळा असा जरा आराम मिळण्याकरिता, आम्ही गावाकडे  गेलो होतो. तेथे वडाच्या झाडांच्या बनात जेवण करण्याचा बेत आम्ही आखला होता. घरूनच आम्ही जेवण तयार करून घेतले होते त्यामध्ये बाजरीची भाकरी, वाटाण्याची उसळ, बटाटा रस्सा,  चपाती व मुलांसाठी बेसन पोळी  नेहमीप्रमाणे वाटेने जेवण करताना आम्हाला आवडणारा खास पदार्थ म्हणजे कांदा भजी सोबत घेतले होते.



     आम्ही जेव्हा गावी पोहोचलो तेव्हा दुपारचे एक वाजले असतील,इतरही मंडळी आपापल्या गाड्या घेऊन बनात जेवण करता आलेली होती. फक्त जेवणासाठीच नाही तर आमच्या गावातील प्रसिद्ध महादेवाच्या दर्शनासाठी व दर्शन झाल्यावर बनात येऊन सर्व जेवण करीत असत.



   आमचे ते खेडेगावच बर का पण महाशिवरात्री सोमवार व महादेवाच्या यात्रे दिवशी गावात खूप गर्दी परंतु इतर वारी सर्व काही सामसूम असे. ठराविक लोक दर्शनासाठी येत असत. आम्ही जेवण करण्यासाठी जमिनीवर चटई अंथरून त्यावर बसलो ,डबे उघडले ताट वाढून घेण्यास सुरुवात केली.



 तेवढ्यात तेथे एक आजी म्हातारी बाई अंगात साधं लुगडं, हिरव्या रंगाचा सेटर ,रंग काळा व चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या केस विस्कटलेले होते पण डोक्यावर पदर होता. हातात पांढऱ्या रंगाची कॅरीबॅग त्यामध्ये काही खाऊ दिसत होता.त्या म्हातारीची उंची चार फूट असावी तिचे वय 65 च्या पुढे असेल, मी डब्यातील एक भाकरी, वाटाण्याची उसळ आणि एक भजी एका पेपरच्या पानात त्या म्हातारीला खायला दिला पण तिने ती ते सर्व तिच्या हातामधील पावसाळी पिशवीमध्ये ठेवले. आमचं जेवण होईपर्यंत ती म्हातारी तेथेच बसून होती. ती स्वतःशीच बडबड करीत होती ,"बरं झालं महादेवाच्या दर्शनाला आला, तो सगळ्यांचा चांगलं करतो तुमचं पण चांगलं करेल". ती अशी सारखी बडबडत होती ती वेड्यासारखीच वाटत होती, पण माझी आई तिच्याबरोबर बोलू लागली. तेव्हा समजलं की,आमच्या गावातीलच होती .

मी त्यांना म्हणाले ,"तुम्ही मागून का खाता, कोण नाही का सांभाळत तुम्हाला?" त्या म्हणाल्या," कोण कोणाचं नसतं ग बाई कुठला भाऊ आणि भावजय कोणाला खायला देतयं.असंच मागून खातं मी ". मग मी विचारलं तुमचं लग्न झालंय का मुलं नाहीत का तुम्हाला त्या म्हणाल्या,"मला एक सक्काभाऊ,एक बहीण ,आई लहानपणीच वारली ". लहान असताना मी ,माझे भाऊ-बहिण, माझे वडील आम्ही एकत्र गावातच राहत होतो. वडील अपंग असल्यामुळ त्यांना व्यवस्थित काम करिता येत नसल्यानं ते काम करून जे काही थोडे पैसे मिळत  त्यातच आम्ही खायचं सामान आणून आठवडा घालवत असे.     

                मी तेरा वर्षाची असताना वडिलांनी माझं लग्न लावून दिलं. लग्नाच्या दहा दिसानं नवरा घर सोडून गेला ती पुना परत आला नाय. नवऱ्याची वाट बघत महिनाभर सासूच्या घरी राहिली सासरची परिस्थिती गरीबच होती. किती दिवस सासूच्या जीवावर  जगायचं म्हणून परत वडिलांच्या घरी माघारी आले . थोड्या दिवसानंतर वडील वारले एक भाऊ होता तो ही  लग्न झाले नंतर त्याच्या बायकोला घेऊन मुंबईला गेला तिथेच काम करून राहिला ,पुना गावाकड आला नाही. 

         वडील वारल्यानंतर बहिण ही वेड्यासारखी वागू लागली होती .तिला काही समजत नव्हते. मी आणि माझी बहीण गावातील रस्ते साफ करणे ,झाडे तोडून देणे अशी कामे करू लागलो त्यामुळे आम्हाला पोट भरण्यासाठी पैसे मिळू लागले . काही दिवसांनी बहिणी वारली आणि आता मी एकटीच होते . नातेवाईकांच्या शेजारी आमच्या काडाच्या घरात तिथेच राहू लागले. जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं काम करणं कठीण होत गेलं, मग दिवसभर महादेवाच्या मंदिरापाशी बसून राहायचे, या देवाने मला कस जगायचं ती शिकवलंय एवढ हाल झालं पण या महादेवांना अजून मला एकदाही उपाशी झोपवलं नाय.

     एवढे बोलून ती म्हातारी आजी तेथून निघून गेली ,पण मला त्या आजीच्या बोलण्यातून तिच्या जीवनातील संघर्षातून एक शिकवण मिळाली की ,आपल्याकडे सर्व काही असताना छोट्या छोट्या गोष्टींकरिता आपण त्रास करून घेतो ,तिच्या जीवनात संघर्ष खूप होता , तिला आयुष्य जे भेटलं त्यामध्ये ती खूप समाधानी आहे.  तिला कोणत्याही गोष्टीची आशा नाही .हे जीवन आपणास फक्त एकदाच मिळते आणि त्याचा आनंद आपण पूर्णपणे घेतला पाहिजे हाच बोध  खऱ्या घटनेतून शिकावयास मिळाला. 

             

Comments

Popular posts from this blog

Life motivation

The true story of a village woman